Sunday, April 15, 2007

चाफ्याच्या झाडा

सुनीताबाईंनी पु.लं.च्या स्मृतीदिनी केलेल्या कार्यक्रमाची "कवितांजली" नावाची अप्रतिम सीडी काही दिवसांपूर्वी हातात पडली. गोविंदाग्रज, बा. सी. मर्ढेकर, आरती प्रभू, बा. भ. बोरकर यांच्या अनेक चांगल्या चांगल्या कवितांचं वाचन केल्यानंतर त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी पद्मा गोळेंच्या दोन नितांतसुंदर कविता वाचल्या आहेत - 'चाफ्याच्या झाडा' आणि 'आताशा मी नसतेच इथे'. 'या कविता माझ्या स्वत:च्या आहेत, मी लिहिलेल्या नसल्या तरी', असं म्हणून अत्यंत आत्मीयतेने वाचलेल्या या दोन कविता मला सारख्या आठवत राहिल्या, त्यातही खास करून 'चाफ्याच्या झाडा'.


चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आलास आज स्वप्नात
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दु:ख उरलं नाही आता मनात

फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रमतो माझ्या मनात
केसात राखडी आणि पायात फुगडी मी वेडीभाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळ्खीच्या तालात ओळखीच्या सुरात हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्याच चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा मनात पानात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय, कळतंय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून जगायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं ओंजळ फुलांनी भरलीय ना
-कवयित्री पद्मा गोळे

कॉलेज मधून बाहेर पडून मी नोकरीला सुरवात केली त्याला आता दहा वर्षं होऊन गेली आहेत. 'काहीतरी चांगलं काम करायचंय' या स्वप्नांची जागा 'मुलांसाठी, कुटुंबासाठी वेळ मिळायला हवा' या वास्तवाने घेतली आहे. हे चाफ्याचं झाड मला अधून मधून भेटत राहतं, सळसळत्या उत्साहानं माझ्या ग्रुप मधे प्रवेश करणाऱ्या काही मैत्रिणींच्या रूपानं!