Monday, January 10, 2011

सृष्टी तुला वाहुनी धन्य माते

रोज रात्री मुलांना झोपवताना आम्ही मराठी कविता/गाणी म्हणतो. त्यातलीच ही एक कविता - मी शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात होती. बहुधा ना. वा. टिळकांची आहे. माझ्या पाच वर्षांच्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलाला या कवितेचा अर्थ कळत असेल असं मला अजिबात वाटत नाही. पण आज सकाळी सकाळी तो मला म्हणाला, "आई, ती कविता आहे ना, माते महात्मे असलेली, ती खूप relaxing आहे." मला गम्मत वाटली. त्याबरोबरच, ही कविता (आणि अशा अनेक कविता) अतिशय सुंदर पद्धतीने शिकवणाऱ्या चौबळ बाई आठवल्या. त्यांना माझा नमस्कार!

सृष्टी तुला वाहुनी धन्य माते अशी रुपसंपन्न तू निस्तुला
तू कामधेनू खरी कल्पवल्ली सदा लोभला लोक सारा तुला
या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी

माते महात्मे तुझे तत्ववेत्ते तुझे शूर योद्धे तुझे सत्कवी
श्रेणी त्यांची सदा माझिया गे मना पूजनी आपुल्या वाकवी
त्यांची यशे ज्या नव्या सद्गुणांना मला अर्पिती धेय्य ते गे जरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी

तूझ्या महोदार सारस्वताच्या महासागारीचा जरी मीन मी
झालो तरी गे तृषा मन्मनाची कधीही कधीही न होणे कमी
आई गुरूस्थान अंती जगाचे तुझे यात शंका न काही जरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी

वारा तुझ्या स्पर्शने शुद्ध झाला मला लाधला भाग्य हे केवढे
माते स्वये देशी जे अन्नपाणी सुधा बापुडी कायशी त्यापुढे
तू बाळगीशी मला स्कंधी अंकी सुखाची खरी हीच सीमा पुरी
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभूमी असे पाहिले मी न कोठे तरी

Wednesday, December 31, 2008

गाडा

"कवितांजली" मधली अजून एक सुंदर, अंतर्मुख करणारी कविता-

कुणासाठी कुणासाठी कशासाठी कुठवर
रेटायाचा ऐसा गाडा इमानाने जन्मभर
गाणे सुरु झाले तेव्हा चंद्र होता डोईवर
गाणे मध्यावर अाले चंद्र झाला रानभर
गाणे संपले अाणिक पक्षी फडाडला तमी
अाणि तसाच मिटला घरटयात अंतर्यामी
वाट रानातली किर्र हुरहूर सर्वदूर
चक्रे फिरती फिरती करकरे चराचर
कळ्या फुलतात येथे पाने गर्द वाजतात
फुले गळतात येथे तरी पाने वाजतात
पाने गळतात येथे तरी वारे वाजतात
वारा पडला तरीही दूर घंटा वाजतात
कुणासाठी भरू पाहे डोळा ऐसे उष्ण पाणी
कुणासाठी झरताहे झरा गप्प ऐषा रानी
कुणासाठी झुरताहे अायुष्य हे क्षणोक्षणी
कुणासाठी सालोसाल रस भरे फळातुनी
प्रश्न नव्हे पतंग अन् खेचू नये त्याची दोरी
अाणि खेचली तरीही मिटेल का चिंता सारी
कुणासाठी कशासाठी कुठे अाणि कुठवर
ऐसे घोकित घोकित व्हावयाचे दिगंबर
- अारती प्रभू

Monday, November 12, 2007

चिऊताई..

कुसुमाग्रजांची ही एक मस्त कविता "नक्षत्रांचे देणे - आता खेळा नाचा" VCD मधे ऐकायला मिळाली. सलील कुलकर्णींनी या कवितेला फार सुंदर चाल लावली आहे.

उठा उठा चिऊताई
सारिकडे उजाडले
डॊळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही

सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही अजूनही

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या चिमुकल्या

बाळाचे घेता नाव
जागी झाली चिउताई
उडूनिया दूर जाई
भूर भूर

लहान मुलांच्या VCD मधे असलेली, वरवर पाहता लहान मुलांची वाटणारी ही कविता खरं म्हणजे आईसाठीच लिहिलेली वाटली. VCD ऐकल्यापासून ही कविता नेहमीच मला आठवत असते - खास करून कसोटीच्या क्षणी!

Friday, May 18, 2007

आई तू कशाला गं जातेस ऑफिसात?

माझा दोन वर्षांचा मुलगा अपूर्व डे-केअर मधे जाताना सहसा रडत नाही. अगदी लहानपणापासून तो तिथे जात असल्यामुळे त्याची सगळ्यांशी मस्त गट्टी जमली आहे. मला मजेत टाटा करून तो त्याच्या मित्र-मैत्रिणींशी खेळायला सुरवात करतो. पण कालचा दिवस मात्र वेगळा होता. काल अपूर्व मला सोडायला अजिबात तयार नव्ह्ता. मी बराच वेळ त्याची समजूत घातल्यानंतर त्याने मला जाऊ दिलं, पण खिडकीतून मला जाताना पाहून तो परत रडायला लागला. मी मन घट्ट करून तिथून निघाले खरी, पण ऑफिसच्या वाटेला लागल्यावर मला खूप अपराधी वाटायला लागलं. आणि मग लहानपणी किशोर मासिकात वाचलेली एक कविता आठवली. कवीचं नाव लक्षात नाही, तुम्हाला आठवत असेल तर जरूर कळवा!

आई तू कशाला गं जातेस ऑफिसात
त्या राजूची आई बघ नेहमी असते घरात

तुला वाटते आपली बाई सांभाळते छान
ती सारखी बडबडते तोंडात धरून पान

शाळेतून घरी येताच राजूची आई दारात
बंद दार पाहून मला रडू येतं जोरात

गोष्टी ऐकता ऐकता राजूचा भात संपतो
थंडगार जेवण मी कसेतरी गिळतो

तू म्हणतेस हवा ना आपल्याला फ्रीज अन टीव्ही
मला यातलं काही नको फक्तं हवी आई

आई-वडील दोघं नोकरीवर जाण्याचे फायदेतोटे आम्ही दोघांनी जाणीवपूर्वक स्वीकारले आहेत. म्हणूनच रोज अपूर्वला डे-केअर मधे सोडताना माझी चलबिचल होत नाही. पण एखादा दिवस असा येतो, की ह्या कवितेतल्या मुलाच्या जागी दिसणारा अपूर्वचा चेहरा मला अस्वस्थ करून सोडतो!

Sunday, April 15, 2007

चाफ्याच्या झाडा

सुनीताबाईंनी पु.लं.च्या स्मृतीदिनी केलेल्या कार्यक्रमाची "कवितांजली" नावाची अप्रतिम सीडी काही दिवसांपूर्वी हातात पडली. गोविंदाग्रज, बा. सी. मर्ढेकर, आरती प्रभू, बा. भ. बोरकर यांच्या अनेक चांगल्या चांगल्या कवितांचं वाचन केल्यानंतर त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी पद्मा गोळेंच्या दोन नितांतसुंदर कविता वाचल्या आहेत - 'चाफ्याच्या झाडा' आणि 'आताशा मी नसतेच इथे'. 'या कविता माझ्या स्वत:च्या आहेत, मी लिहिलेल्या नसल्या तरी', असं म्हणून अत्यंत आत्मीयतेने वाचलेल्या या दोन कविता मला सारख्या आठवत राहिल्या, त्यातही खास करून 'चाफ्याच्या झाडा'.


चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आलास आज स्वप्नात
तेव्हाच तर आपलं नव्हतं का ठरलं दु:ख उरलं नाही आता मनात

फुलांचा पांढरा पानांचा हिरवा रंग तुझा रमतो माझ्या मनात
केसात राखडी आणि पायात फुगडी मी वेडीभाबडी तुझ्या मनात

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळ्खीच्या तालात ओळखीच्या सुरात हादग्याची गाणी नको म्हणू

तुझ्याच चाळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसं काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर बसून आभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा मनात पानात खुपतंय ना
काहीतरी चुकतंय कुठेतरी दुखतंय तुलाही कळतंय, कळतंय ना

चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा हसून जगायचं ठरलंय ना
कुठं नाही बोलायचं मनातच ठेवायचं ओंजळ फुलांनी भरलीय ना
-कवयित्री पद्मा गोळे

कॉलेज मधून बाहेर पडून मी नोकरीला सुरवात केली त्याला आता दहा वर्षं होऊन गेली आहेत. 'काहीतरी चांगलं काम करायचंय' या स्वप्नांची जागा 'मुलांसाठी, कुटुंबासाठी वेळ मिळायला हवा' या वास्तवाने घेतली आहे. हे चाफ्याचं झाड मला अधून मधून भेटत राहतं, सळसळत्या उत्साहानं माझ्या ग्रुप मधे प्रवेश करणाऱ्या काही मैत्रिणींच्या रूपानं!

Saturday, December 09, 2006

इंजिनदादा इंजिनदादा...

माझ्या मुलाला आतिशय आवडणारी "Thomas and Friends" ची DVD घरी अखंड चालू असते. त्यातली इंजिनं एकमेकांशी बोलतात, भांडतात, खेळतात, कधी आपापसात स्पर्धा करतात, तर कधी एकमेकांना मदत करतात! ते बघता बघता मला दुसरीच्या पुस्तकातली "इंजिनदादा इंजिनदादा" ही कविता नेहमीच आठवते. आज ही कविता कोणी लिहिली ते आठवत नाही. कडवी योग्य क्रमाने आठवत आहेत का नाही, तेही माहित नाही. मराठी ब्लॉग विश्वात कवितांचे चाहते खूप आहेत. कोणाला आठवतंय का कवीचं नाव?

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
डबे मी जोडतो, तुम्हाला घेतो
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
निशाण मी बघतो, शिट्टी मी फुंकतो
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
कोळसा मी खातो, पाणी मी पितो
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा इंजिनदादा काय करता?
झुकझुक मी करतो, तुम्हाला घेतो
गावाला जातो नव्या नव्या